ध्येयवेड्या माणसातील ‘वाघ’ वाल्मिक थापर

Valmik Thapar wildlife documentaries
ध्येयवेड्या माणसातील 'वाघ' वाल्मिक थापर

Valmik Thapar and tiger conservation: जंगलातील नीरव शांततेत.. एका धीरगंभीर वजनदार आवाजात, शांतपणे आणि तितक्याच रोचक पद्धतीनं वाघांच्या जीवनशैलीच वर्णन करताना ‘वाल्मिक थापर’ आपल्याला अनेकदा स्क्रीनवर दिसलेयत. थापर यांचं संशोधन, त्यांच्या कथनाची पद्धत प्रेक्षकांना बांधून ठेवणारी, रोमांचित करणारी होती.. हो.. होती.. कारण हा आवाज, ती शांत धीरगंभीर मुद्रा आता अनंतात विलीन झालीय..भारतीय वाघांच्या संवर्धनासाठी आयुष्य वेचणारे ‘वाल्मिक थापर’ यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी नुकतंच निधन झालंय..

‘सुप्रसिद्ध वन्यजीव संरक्षक आणि लेखक असणारे वाल्मीक थापर नेहमी म्हणायचे.. वाघ मला रोमांचित करतात, मला त्यांच्याशिवाय दुसरे काहीही माहीत नाही, माझा लढा नेहमीच अशा क्षेत्रांसाठी आहे, जेथे वाघ मुक्तपणे, माणसांपासून आणि आवाजापासून दूर, शांततेत राहू शकतील.’ तब्बल ५० वर्षे वाघांसाठी लढणारे थापर यांचे निधन झाल्याने, सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रातुन हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

१९५२ मध्ये जन्मलेल्या वाल्मिक यांनी वयाच्या २० व्या वर्षांपासून वन्यजीवांबद्दल कार्य सुरु केलं. काही काळानंतर ते राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात एक माहितीपट बनवण्यासाठी गेले असता, त्यांची ओळख प्रोजेक्ट टायगरच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या फतेहसिंग राठोड यांच्याशी झाली. त्या काळात राठोड यांनी वाघांच्या वर्तनाची आणि संवर्धनाच्या व्यावहारिक पैलूंची वाल्मिक यांना ओळख करून दिली आणि तिथूनच थापर यांचे वाघांशी जिव्हाळ्याचे नाते जडले. त्यानंतर आपल्या आयुष्याची पुढील ५ दशके वाल्मिक यांनी वाघांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी काम केले.

वाघांचा खरा मित्र: वाल्मिक थापर

त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांसाठी काम करताना ३२ पुस्तके लिहिली. यापैकी ‘लँड ऑफ द टायगर’ आणि ‘टायगर फायर’ ही पुस्तके गाजली. वाघांसोबतच त्यांनी वन्यजीव आणि पर्यावरणावर अनेक माहितीपट बनवले. त्यातील त्यांचा शेवटचा माहितीपट ‘माय टायगर फॅमिली’ होता, ज्यामध्ये त्यांनी रणथंबोरच्या वाघांच्या ५ पिढ्यांसोबतचा अनुभव शेअर केलाय. १९८४ मध्ये थापर यांनी मगरींच्या अधिवासात खोल पाण्यात हरणाची शिकार करणाऱ्या ‘मछली’ वाघिणीचे पहिल्यांदाच चित्रीकरण केले. वाघांच्या वर्तनाला समजून घेण्यासाठी संशोधकांना हे दृश्य मैलाचा दगड ठरले. त्यांच्या लेखन आणि कॅमेऱ्यामुळे वाघांचे अद्भुत जग सामान्य लोकांसमोर आले.

काही काळ ते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय वन्यजीव मंडळासह १५० हून अधिक सरकारी पॅनेल आणि टास्क फोर्सचा भाग होते. ७३ व्या वर्षी निधन झालेले वाल्मिक थापर हे वाघांचे कट्टर समर्थक राहिले. त्यांनी जैवविविधता आणि वाघांच्या अधिवासाबाबत आपली रोकठोक भूमिका मांडत सरकारशी अनेकवेळा संघर्ष केलाय. संवर्धनाबाबत त्यांनी केलेल्या अनेक शिफारसी रद्द करण्यात आल्या. थापर हे मुख्यतः भारतातील वन नोकरशाहीचे जोरदार टीकाकार राहिले, त्यांच्या मते, भारतातील वन नोकरशाही दीर्घकालीन निष्क्रिय होती. बहुतेकदा शिकारी रोखण्यापेक्षा कागदपत्रांच्या कामातच वनाधिकाऱ्यांना अधिक रस आहे असे ते म्हणायचे. खऱ्या वन संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती, सार्वजनिक दबाव आणि मानवी हस्तक्षेपापासून मुक्त संरक्षित जागा आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं होत.

व्याघ्र संवर्धनातील थापर यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील वाघांच्या संख्येत खऱ्या अर्थाने सुधारणा झाली. वन्यजीव जीवशास्त्र किंवा संवर्धनाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसताना, थापर यांनी पाच दशकांहून अधिक काळ जनजागृतीचे काम करत अनेक पिढ्यांना वन्यजीव संवर्धनासाठी एकत्र येण्यास प्रेरित केले. रणथंभोर (राजस्थान), पन्ना, कान्हा (मध्य प्रदेश), इंद्रावती (छत्तीसगड), वाल्मिकी (बिहार) आणि पलामू (झारखंड) आणि सरिस्का या व्याघ्र प्रकल्पांमध्ये त्यांनी विशेष काम केलं. वाल्मिक त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत,संवर्धन कार्यात सहभागी होते. विविध टायगरवॉच प्रकल्पांवर मार्गदर्शन करतानाच ते रणथंभोरच्या छायाचित्रांचा एक महत्त्वाचा संग्रह तयार करत होते. अशा या ध्येयवेड्या माणसातील वाघाची डरकाळी आता शमली आहे. जो पर्यंत भारतात वाघ आहेत तो पर्यंत ‘वाल्मिक थापर’ यांचा धीरगंभीर वजनदार आवाज वाघांचे वर्णन करत राहील हे निश्चितय.

न्यूज अनकट प्रतिनिधी, गुरुराज पोरे