मुंबई : विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी नव्या सरकारचे पहिले अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन बेकायदा असल्याचा आरोप केला. फडणवीस यांच्या या आरोपामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.
मात्र, हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुद्दा शांतपणे ऐकून घेतला. त्यानंतर आपल्या याआधीच्या विधानसभा अध्यक्षपदाचा अनुभव वापरत त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे फडणवीसांचा मुद्दा खोडून काढला.विधीमंडळाचे अधिवेशन संस्थगित केल्यास ७ दिवसांच्या आत ते पुन्हा बोलावले जाऊ शकते, हा महत्त्वाचा नियम वळसे पाटलांनी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिला.
या अधिवेशनासाठी राज्यपालांची परवानगी घेण्यात आलेली आहे. त्यांच्या आदेशानूसार हे अधिवेशन बोलावण्यात आलेले आहे. त्यामुळे हे अधिवेशन पूर्णपणे नियमाला धरुन आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र वळसे पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर हा मुद्दा हाणून पाडला.