वंचित विकास संस्थेतर्फे स्वर्गीय विलास चाफेकर लिखित ‘यशोमंदिराचा पाया’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, ८ ऑगस्ट २०२२ : “जमवलेली माणसे हीच संपत्ती मानून रात्रंदिन वंचित घटकांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या विलास चाफेकर यांनी स्वयंसेवकांचे मोठे जाळे तयार केले. निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा पाया भक्कम असेल, तर सामाजिक संस्थेचे कार्य चांगल्या पद्धतीने उभे राहते,” असे प्रतिपादन लेखिका कल्पना जावडेकर यांनी यावेळी केले.

जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विलास चाफेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांनी अखेरच्या दिवसांत लालबत्ती विभागातील दवाखाना व सल्ला, मार्गदर्शन केंद्राचे काम मांडण्याकरिता लिहिलेल्या ‘यशोमंदिराचा पाया-खऱ्या शिल्पकार स्वयंसेविका’ या पुस्तकाचे प्रकाशन जावडेकर व जनरल फिजीशिएन डॉ. हेमंत मांजरेकर यांच्या हस्ते झाले. 

नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या सोहळ्यात लालबत्ति विभागात सेवा देणाऱ्या (पीयर्स स्वयंसेवक) कल्पना कांबळे, रेणुका कोडखणी, बी पन्ना (तृतीयपंथी), पार्वती अत्तुर, मीनाक्षी नवले यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. चाफेकर सरांसोबत पुस्तकाचे काम पूर्णत्वास नेण्यात योगदान देणाऱ्या चैत्राली वाघ यांचाही सत्कार करण्यात आला.

असंख्य लोकांची जोडणी करून चाफेकरांनी उभारलेले कार्य, अजूनही अविरत सुरू आहे. संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरणारे आहे, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सरांना लिहीलेले ‘प्रिय सर’ हे पत्र मीनाताईंनी वाचून दाखवले तेव्हा सरांच्या आठवणी दाटून आल्या अन् उपस्थितांना अश्रु अनावर झाले. ‘माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवणारे, चाफेकर सरांसारखे गुरू मला लाभले आणि शेवटपर्यंत मला त्यांची सेवा करता आली हे माझे परम भाग्य, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यात आज मी सरांना पहातो आहे.’ असे सांगून डॉ. हेमंत मांजरेकर यांनी चाफेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला.

मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती फाटक यांनी वंचित विकास संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मीनाक्षी नवले यांनी लालबत्ती विभागातील कार्याची माहिती दिली. सोहळ्यात वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा