ढाका, 15 ऑक्टोंबर 2021: बांगलादेशातील मंदिरांमध्ये तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. असे सांगितलं जात आहे की दुर्गापूजेच्या वेळी काही कट्टरपंथीयांनी मंदिराची तोडफोड केली. मंदिराची तोडफोड झाल्यानंतर तेथे दंगलीही झाल्या, ज्यात तीन लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तणाव नियंत्रित करण्यासाठी 22 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलं तैनात करण्यात आली आहेत.
वृत्तसंस्था पीटीआय’ने बांगलादेशच्या प्रसारमाध्यम bdnews24.com च्या हवाल्याने म्हटलंय की, अफवा पसरवल्यानंतर कमिला येथील एका स्थानिक मंदिराला लक्ष्य करण्यात आलं. यानंतर हिंसक चकमक झाली, ज्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पोलीस आणि प्रशासनाने केला. या घटनेनंतर चांदपूरच्या हाजीगंज, चॅटोग्रामच्या बांशखली आणि कॉक्स बाजारच्या पेकुआ येथेही मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, एका क्षणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती आणि येथे प्रचंड दंगली उसळल्या.
वृत्तपत्राच्या मते, कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी पोलीस आणि प्रशासनावरही हल्ला केला. डेली स्टार वृत्तपत्राच्या अहवालात म्हटलंय की, कमिलामधील घटनेनंतर पोलीस आणि लोक हाजीगंज, चांदपूर येथे समोरासमोर आले. या चकमकीत किमान तीन जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, यानंतर बांगलादेश पोलिसांची रॅपिड अॅक्शन बटालियन (आरएबी), अर्धसैनिक बल सीमा रक्षक बांगलादेश (बीजीबी) जवान येथे तैनात करण्यात आले होते. बांगलादेशच्या 22 जिल्ह्यांमध्ये बीजीबी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, धार्मिक व्यवहार मंत्रालयाने आपत्कालीन नोटीस जारी केली असून लोकांना कायदा हातात घेऊ नका असे आवाहन केलं आहे.
बीजीबीचे ऑपरेशन डायरेक्टर लेफ्टनंट कर्नल फैजूर रहमान यांनी सांगितलं की, गृह मंत्रालयाच्या विनंतीनुसार, दुर्गा पूजा पंडलवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बीजीबीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गरज पडल्यास आणखी सैनिक तैनात केले जातील, असं त्यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे









































