वंदे भारत अभियाना अंतर्गत मुंबईत आतापर्यंत परतले २४२३ भारतीय

मुंबई, दि. २४ मे २०२०: वंदे भारत अभियाना अंतर्गत मुंबई विमानतळावर १७ विमानांतून २ हजार ४२३ भारतीय नागरिक काल पर्यंत विदेशातून परतले आहेत. यापैकी ९०६ प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत तर उर्वरित महाराष्ट्रातील १ हजार १३९ आणि इतर राज्यातील ३७८  प्रवासी आहेत.

दि. ७ जूनपर्यंत आणखी १३ विमानांनी विदेशातील भारतीय नागरिक परतणार आहेत. दरम्यान, परतलेल्या नागरिकांपैकी मुंबईतील विविध ४३ हॉटेल्स्‌मध्ये मिळून सुमारे १ हजार १२८ नागरिकांना अलगीकरण व्‍यवस्थेत ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदे भारत अभियाना अंतर्गत भारतात परत आणण्यात येत आहे. मुंबईत विशेष विमानांनी परतणा-या नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासनाने सर्व कार्यवाही आखली आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा समन्वयाने कामकाज करत आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन विशेष विमानांनी परत येणा-या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण (क्वारंटाईन) केले जात आहे. प्रामुख्याने इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयात पाठविण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.  इतर जिल्हे व राज्यातील नागरिकांना त्यांचे संबंधित जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत अलगीकरण (कॉरंटाईन) केले जाणार आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईत अलगीकरण व्यवस्थेमध्ये पाठवले जाते. वाहतूक परवाना संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येते.

बृहन्मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन) ची सुविधा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८८ हॉटेलमध्ये मिळून ३३४३ कक्ष आरक्षित केले आहेत.

प्रारंभी विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे विमानतळ यंत्रणेमार्फत तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येते. त्यानंतर महसूल विभागनिहाय उपलब्ध असलेल्या टेबलवर जाऊन प्रवाशांना वाहतूक परवाना (ट्रॅव्हल पास) दिला जातो. हा परवाना घेऊन द्वार क्रमांक ४ येथे प्रवासी येतात. तेथून प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहने पुरवतात. तर बृहन्मुंबईतील नागरिकांना बेस्ट बसेसमार्फत रवाना केले जाते. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळदेखील बसेस पुरवत आहे.

• दि. १० मे रोजी लंडन येथून ३२६, सिंगापूरहून २४३  आणि मनिला येथून १५०  नागरिक परतले.

• ११ मे रोजी सॅनफ्रान्सिको येथून १०७ आणि ढाका येथून १०७ जण आले.

• दि. १२ मे रोजी न्यू यॉर्क येथून २०८ तर क्वाललांपूर येथून २०१ नागरिक परतले.

• दि. १३ मे रोजी शिकागो येथून १९५, लंडन येथून ३२७ तर कुवेत मधून २ जण आले.

• दि. १७ मे रोजी अदिस अबाबाहून ७८ तसेच काबूल येथून १२ जणांचे आगमन झाले.

• दि. १८ मे रोजी मस्कत येथून १६ जण,

• दि. १९ मे रोजी मनिला येथून ४१ जण मुंबईत आले.

• दि. २० मे रोजी मनिला येथून २९ प्रवासी,

• दि. २१ मे रोजी जकार्ता येथून १८५ प्रवासी तर

• परवा २२ मे रोजी जोहान्सबर्गमधून १९६  जण मुंबई विमानतळावर उतरले आहेत.

यापुढे दि. ७ जूनपर्यंत जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून मुंबईत भारतीय नागरिक परतणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा