नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसी येथील हिंदू विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या फोटोशी छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सावरकरांचा फोटो भिंतीवरून काढून खाली टाकला आणि त्यावर शाई फेकली. विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्यासह अन्य महान लोकांचे फोटो लावण्यात आले आहेत.
या घटनेसंदर्भात एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एम.एच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी जेव्हा १०३ क्रमांकाच्या वर्गात गेले तेव्हा त्यांना सावरकरांच्या फोटोशी छेडछाड करण्यात आल्याचे दिसले. वर्गातील सावरकरांचा फोटो खाली टाकण्यात आला होता आणि त्यावर शाई लावण्यात आली होती.
या घटनेनंतर विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच विभाग प्रमुखांनी घटनास्थळी धाव घेतली. विभाग प्रमुखांनी या घटनेचा निषेध केला असून संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठाने ३ जणांची समिती नेमली असून ही समिती या घटनेची चौकशी करेल. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.