महसूल पंधरवाड्यात जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध उपक्रम

जालना २ ऑगस्ट २०२४ : शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेला तत्परतेने या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, यासाठी विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलीय. महसूल पंधरवाडा दि. १ ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान राबविण्यात येत आहे.

महसूल दिनानिमित्त या पंधरवाड्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महसूल भवन येथे पार पडला. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, पदमाकर गायकवाड, सविता चौधर, नम्रता चाटे आदींसह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. जनतेला विविध सेवा देण्याबरोबरच महत्वाच्या योजनांचा तत्परतेने लाभ देण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. महसूल दिनानिमित्त महसूल पंधरवाड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या पंधरा दिवसांत विविध उपक्रमांतून महसूल विभाग लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगल्या पध्दतीने कार्य करुन उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच नवनियुक्त तलाठी, कोतवाल यांनाही प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अव्वल कारकून म्हणून पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा