भाजीपाल्यांचे दर कडाडले, आगामी काळात आणखीन दर वाढणार …

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२०: मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही पावसाळा लांबणीवर पडला आहे. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षाही या वर्षी पावसाने चांगली जोरदार हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात पावसाने राज्यात सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. या आधी पडलेल्या पावसामुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं तर या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. परिणामी आगामी काळात भाज्यांचे दर गगनाला भिडणार हे नक्कीच.

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच भाज्यांच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. कांद्याच्या किमतीत वाढ होऊ नये म्हणून केंद्र सरकारने देखील कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचाही कोणताही फायदा झालेला दिसला नाही. कांद्याच्या दरामध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता भाजीपाल्यांचे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे देखील आगामी काळात भाजीपाल्यांच्या दरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

ऐन सणाच्या तोंडावर पावसाने केलेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारामध्ये देखील भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला आहे त्यामुळे सध्या दरांमध्ये वाढ दिसून येत आहे. मुंबईच्या घाऊक बाजारात वाटाणा १५० रुपये प्रतिकिलो तर कांदा ६० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्याची किंमत वाढल्यामुळे पर्यायाने किरळोळ बाजारतही भाजीपाल्यांचे भाव कडाडणार असल्याचे म्हटले जात आहे.

घाऊक बाजारात कांदा, मिरची तसेच इतर भाजीपाल्यांची आवक घटली आहे. पाच दिवसांपूर्वी घाऊक बाजारात कांदा ३५ ते ५० रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. किरकोळ बाजारात त्याची किंमत ६० रुपये प्रतिकिलो होती. पण, आता घाऊक बाजारात कांद्याचा भाव वाढला असून तो ६० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. यंदाच्या वर्षीही कांदा शतकी खेळी करतो की काय अशी भीती आगामी काळात व्यक्त केली जात आहे.

मुंबई बाजार समितीमध्ये दररोज ४०० ते ५०० वाहनं भाजीपाला विक्रीसाठी येत असतात. पण अतिवृष्टीमुळे दिवसभरात फक्त ३७३ गाड्यांची आवक होत आहे. सध्या नवी मुंबईत घाऊक बाजारात कोबी ४०, कारली ४०, मिरची ७० ते ८०, शिमला मिरची ७० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. तर भेंडी ५०, गवार ६५, टोमॅटो ३५, वाटाणा १५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा