ऑक्टोबरमध्ये वाहन कंपन्यांना धक्का, वाहन विक्रीत २४ टक्क्यांनी घट

नवी दिल्ली, १० नोव्हेंबर २०२०: ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाहनांची विक्री ज्या प्रकारे झाली, ती ऑक्टोबरमध्येही विक्रीची मोठी आकडेवारी समोर येईल, अशी अपेक्षा होती. कारण, ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या सुरूवातीला विक्री वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील महिन्यात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झालीय.

केवळ आणि केवळ प्रवासी वाहनांच्या विभागात काही वाहन कंपन्यांनी गेल्या महिन्यात विक्रीचे चांगले आकडे सादर केले. यात मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि किआ मोटर्सच्या गाड्यांची विक्री चांगली झाली आहे. तर इतर कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) च्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरमध्ये प्रवासी कारच्या विक्रीत ८.८ टक्क्यांनी घट झालीय.

एफएडीएच्या आकडेवारीनुसार, प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री वर्षाच्या आधारावर ऑक्टोबरमध्ये ८.८ टक्क्यांनी घसरून २,४९,८६० वाहनांवर आलीय. एका वर्षापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रवासी वाहनांची विक्री २,७३,९८० वाहने होती. पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळं वाहनांची नोंदणी मंदावली आहे.

जर आपण टूव्हीलर्सच्या विक्रीबद्दल बोललो तर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी घटली आहे. ऑक्टोबरमध्ये एकूण १०,४१,६८२ दुचाकींची विक्री झाली. तर ऑक्टोबर २०१९ मध्ये एकूण १४,२३,३९४ दुचाकींची विक्री झाली. वर्षाच्या आधारे विक्रीत २६.८२ टक्क्यांनी घट झाली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केवळ नवरात्रीतच विक्रीत वाढ झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक घट झाली. फाडाच्या मते, मागील महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री ३०.३२ टक्क्यांनी घसरून ४४,४८० वाहनांवर आली आहे. वर्षभरापूर्वी याच काळात ६३,८३३ वाहनं विकली गेली. एफएडीए देशभरातील १,४६४ प्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी १,२५७ कार्यालयांकडून वाहन नोंदणी डेटा गोळा करते.

ऑक्टोबरमध्ये तीनचाकी वाहनांची विक्री देखील ६४.५ टक्क्यांनी घसरून २२,३८१ वाहनांवर आलीय. एक वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोबर-२०१९ मध्ये ही विक्री ६३,०४२ युनिट्स होती. तथापि, या काळात ट्रॅक्टरची विक्री ५५ टक्क्यांनी वाढून ५५,१४६ वाहनांवर पोहोचली. एका वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०१९ मध्ये ट्रॅक्टरची विक्री ३५,४५६ युनिट होती.

ऑक्टोबरमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा होती. परंतु, विक्री २३.९९ ने घटली. मागील महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत २३.९९ टक्क्यांनी घसरून १४,१३,५४९ वाहनांवर आली आहे. एका वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोबर-२०१९ मध्ये ते १८,५९,७०९ युनिट्स होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा