वेल्हे,दि.४ जून २०२०: वेल्हे तालुक्यामध्ये चक्रीवादळाचा फटका बसला असून ठिकठिकाणी प्रशासकीय इमारतींबरोबर नागरीकांच्या घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे पडली असून सांयकाळी सात पर्यंत तालुक्यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारतींमध्ये चिरमोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे ,विठ्ठलवाडी येथील अंगणवाडीचे ,मालवली येथील व सोंडे सरपाले येथील ग्रामपंचायतीचे पत्रे उडाले असून या ठिकाणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर तालुक्यातील अंत्रोली येथील पंधरा ते वीस घरांचे नुकसान झाले आहे तर अंबवणे गावामधील काशिनाथ ननावरे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. तर मार्गासनी येथील
संपत रामचंद्र मोहिते यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. भिंत कोसळली आहे. तर साखर गावातील बाळकृष्ण गायकवाड यांच्या घराचे नुसान झाले आहे. तर ग्रामसेवंकाकडून इतर ग्रामपंचायतीबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याची गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.
वेल्हे -चेलाडी रोडवरील अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडे पडली होती. यामध्ये प्रामुख्याने विंझर, मार्गासनी, आडवली येथे पडलेली झाडे काही वेळातच बाजुला करुन रस्ता मोकळा केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अश्विनी घोडके यांनी दिली. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जोराच्या वादळामुळे विजेचे खांब मोडले असून काही ठिकाणी खांब पडले आहे तर अनेक ठिकाणच्या विजेच्या तारा तुटल्या आहेत तर उच्च दाब वाहिनीचे तेरा खांब,तर लघुदाब
वाहिनीचे अठरा खांब उन्मळून पडले असुन अनेक गावे अंधारात असून युध्द पातळीवर काम सुरु असल्याची माहिती महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते यांनी सांगितले. वेल्हे तालुका दुर्गम असूव अद्यापही काही गावे संपर्कहिन असून या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर