मुंबई, 3 फेब्रुवारी 2022: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यातही पत्नी सीमा देव यांच्यासोबतचे सारेच सिनेमे हिट झाले. अभिनेते रमेश देव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सिनेमा, अभिनय या कलाक्षेत्राला वाहून दिलं होतं. वडिलांप्रमाणेत अजिंक्य देव अभिनय क्षेत्रात आहे. तर अभिनय देवही चित्रपटसृष्टीतच काम करत आहेत.
रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. 1951 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 1956 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या 1962 साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास 180 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रमेश देव यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारं नुकसान चित्रपट सृष्टीचं झालं आहे. देव यांनी सुरूवातीपासून आपल्या कसदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. देव यांनी 190च्या वर मराठी सिनेमांत अभिनय केला आहे, तर 285पेक्षा जास्त हिंदी सिनेमात भूमिका केल्या आहेत. अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शनवरील मालिकासांठी दिग्दर्शनह केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंही रमेश देव यांचा सन्मान करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे