पुणे, ४ फेब्रुवारी २०२३ : संगीत जगतातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ गायिका वाणी जयराम (वय ७८) यांचे निधन झाले. नुकतेच भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली होती. विशेषत: त्या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सक्रिय होत्या. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.
वाणी जयराम यांचा दक्षिणेत मोठा वारसा आहे. गायिका वाणी जयराम यांनी १९७१ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. ५० वर्षांत त्यांनी पार्श्वगायक म्हणून १०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. १९७१ मध्ये जया बच्चन यांच्या गुड्डी या चित्रपटात त्यांनी पहिले गाणे गायिले होते. हा चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर वाणी जयराम यांनी मागे वळून पाहिले नाही आणि एकापेक्षा एक सरस गाणी गायिली.
वाणी यांना त्यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी भारत सरकारचे तीन राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. याशिवाय त्यांच्या नावावर तीन फिल्मफेअर पुरस्कार आहेत. वाणी जयराम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दिग्गज गायक के. जे. येसुदार व एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्यासोबत गाणी गायिली. वाणी जयराम यांना नुकतेच संगीत विश्वातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता; पण हा सन्मान घेण्याअगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली, याची खंत आहे; पण त्यांचा आवाज कायमस्वरूपी लोकांच्या हृदयात जिवंत राहील.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड