स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात खेळाडूंची विजयी कामगिरी… पंतप्रधाम मोदींनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट, २०२२ : बर्मिगहॅम येथील कॉमनवेल्थ गेम्स नुकतेच संपुष्टात आले आहे. यात भारताने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत ६१ पदकांची प्राप्ती केली. हे सर्व खेळाडू भारतात परत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या सर्व खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शाबासकी दिली.

यावेळी त्यांनी भाषणात सांगितले की, तुमच्या यशस्वी आणि प्रेरणादायी कामगिरीच्या साथीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पदार्पण करत आहे. यावेळी नेहमीच्या खेळापेक्षा भारताने चेस ऑलिम्पियाडचे आयोजन केले. त्यात भरीव कामगिरीदेखील केली. आजचा दिवस हा विजयोत्सवाचा दिवस आहे. ज्यांनी पदक प्राप्त केले आणि ज्यांना पदकाने अगदी थोडक्या कारणाने हुलकावणी दिली, या सर्वांचे मी आभार मानतो. असेही मोदी यांनी नमूद केले.

पी.व्ही सिंधू, विनेश फोगट, किद्मबी श्रीकांत, बजरंग पुनिया ही तर पिढी सक्षम आहे. पण लक्ष्य सेनसारख्या नव्या खेळाडूने देखील आपल्याला पदक मिळवून दिले. जेव्हा तुम्ही तिकडे खेळत होता, तेव्हा इकडे संपूर्ण भारत देशाच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या होत्या. पदक किती मिळतात, कोणती मॅच चालू आहे, कोणाला कोण हरवतंय, अशा अनेक प्रश्नांनी भारत देश तुमच्या खेळाकडे नजरा लावून होता.

अनेक नव्या खेळांना यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. नवे खेळाडू यामुळे प्रेरित होत आहेत. ज्यांमुळे नव्या भारताची उर्मी दिसून येत असल्याचं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. आम्ही प्रत्येक खेळात डटून प्रयत्न करत आहोत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, तेव्हा त्यांचे लक्ष एक होते. तसेच यावेळच्या खेळाडूंचे लक्ष एक होते. त्यांनी आपल्या भारत देशाचा अभिमान राखून देशाला पदकांच्या यादीत चौथ्या स्थानावर आणले.

ही कामगिरी त्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी केली आणि अशीच कामगिरी ते पुढेही करत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा