नवी दिल्ली, २६ डिसेंबर २०२२ :आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक कोचर यांच्या अटकेनंतर सीबीआयने आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात सोमवारी व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सोमवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. धूत यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.
चंदा कोचर या जेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ होत्या त्यावेळी साडेतीन हजार कोटींचे लोन नियम डावलून व्हिडीओकॉन ग्रुपला देण्यात आले होते, त्यानंतर व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचा आर्थिक फायदा करून दिला होता. याच वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.