कल्याणात विद्यार्थी भारतीचे आमरण उपोषण

कल्याण, दि. १६ जुलै २०२०: देशासह राज्यात कोरोनाचे संकट असताना युसीजीने शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल असा फतवा काढला. कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडल्यास त्यांना  कोरोनाची लागण होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या परीक्षा घेण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह विद्यार्थ्यांसाठी काम करणारी ”विद्यार्थी भारती” ही संघटना मैदानात उतरली आहे. विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे.
                                                                                                                                  गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी भारतीतर्फे केंद्र सरकार आणि युसीजीला परीक्षा रद्द करण्यात याव्यात ही मागणी केली जात होती. मात्र केंद्र सरकार आणि युसीजीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आमरण उपोषण करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 विद्यार्थी भारतीने या प्रमुख मागण्या केल्या आहेत:

१) अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे.
२) ATKT आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे. 
३) सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जावी. 
४) कोणत्याही प्रकारची फी / रक्कम घेतली जाऊ नये. 
५) कोणत्याही प्रकारचे लेक्चर किंवा प्रोजेक्ट जमा करण्यासाठी सक्ती केली जाऊ नये. 
या मागण्यांसह विद्यार्थी भारती संघटनेने कल्याणातील मैत्रीकुळ (शांतीभवन) येथे आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांचा देखील मोठा पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी सोशल मीडियावर या आंदोलनाला देत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे . आता शासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा