मुंबई, १५ मे २०२१: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, असे सांगितलेय. तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना प्रशासनास दिल्यात.
काय म्हंटलं ट्विटमध्ये
समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने काल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सूचना प्रशासनास दिल्या. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे, त्यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून १८ मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल. त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल.
राज्यात कुठे पाऊस पडेल
चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर १५ ते १७ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर १४ मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल. तर १५ मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

