वीज पडून आठ जणांचा मृत्यू.

महाराष्ट्र: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यात वीज पडून चौघांंचा मृत्यू झाला. बुधवारी ३० ऑक्टोबरला ही दुर्घटना घडली. त्यात अकोट तालुक्यातील शेतमजूराचा तर तेल्हारा तालुक्यात १२ वर्षीय मुलीसह तिघांचा समावेश आहे. या तालुक्यातील दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. अकोट तालुक्यातील घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे.

तेल्हारा तालुक्यात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी पावसासह विजांच्या कडकडाट झाला. यात तालुक्यातील भोकर शेत शिवारात वीज कोसळल्याने १२ वर्षीय मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. तालुक्यातील भोकर शेतशिवारात भोकर येथील अढाऊ कुटुंब, वरुड येथील गणेश मोकळकर हे अजबराव बिहाडे यांच्या शेतात कापूस वेचण्यास गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसासह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. पावसापासून बचावकरीता शेतातील मजुरांनी झाडाचा आडाेसा घेतला. परंतु दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळली. यात गजानन गुलाबराव अढाऊ (वय २७), लक्ष्मी नागोराव अढाऊ (वय १२), गणेश मोकळकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मीना गोपाल नारे (वय ३२) वैष्णवी नागोराव अढाऊ (वय १६) व नागोराव गुलाबराव अढाऊ (वय ४) हे तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

अकोट तालुक्यातील लाडेगाव शिवारात ज्वारीची कापणी करताना वीज कोसळून शेतमजूर दादाराव पळसपगार रा. बेलुरा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर दुसरा शेतमजूर अनिल पंचांग गंभीर जखमी झाले. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात हलवले असता उपचारानंतर अनिल पंचांग यांना अकोला येथे पाठवले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची हानी करणे सुरू ठेवले असून, आता शेतकरी, शेतमजुरांच्या जीवालाही धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे मृताचे कुटुंब आणि जखमीला मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा