दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगीक क्षेत्रात प्रदूषण करत असल्याचा ठपका ठेवत प्रदूषण मंडळाने हार्मोनी ऑरगँनिक्स या कंपनीला नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्यासाठी या प्रकल्पाचे वीज व पाणी बंद करण्याचे आदेश (दि.९) रोजी तत्सम विभागाला देण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाच्या कुरकुंभ येथील कार्यालयाने या कंपनीचा पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कुठलाही अधिकृत आदेश मेलद्वारे आलेला नसल्याचे सांगितले आहेत.
परिणामी एकीकडे कारवाई करायची आणि दुसरीकडे सहकार्य अशी दुतोंडी भूमिका प्रदूषण मंडळ घेत आहे. वीज वितरण यामध्ये कारवाईस दिरंगाई करीत आहे. यामध्ये प्रकरण अडकले असल्याने या दोन्ही विभागाच्या भूमिका या संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे.
पांढरेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने हार्मोनी कंपनीने केलेल्या प्रदूषणाचा कट उघडा पडला. ग्रामपंचायत पांढरेवाडीने प्रदूषण मंडळाकडे पुराव्या सहित तक्रार करीत कारवाईची मागणी केली. त्यामुळे प्रदूषण मंडळाने देखील यावर तपास करीत कारवाई केली. मात्र आता हि कारवाईच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारवाई करण्यासाठी प्रदूषण मंडळाचे प्रादेशीक अधिकारी जगन्नाथ साळुंके यांच्या सूचनेनुसार तत्सम विभागाला मेल पाठवून कळवण्यात आले असल्याची माहीती प्रदूषण मंडळाचे अधिकारी सुर्यकांत शिंदे यांनी दिली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे वीज वितरण विभागाचे बारामती, केडगाव, कुरकुंभ येथील अभियंता सांगत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान या सर्व प्रकारात वीज वितरण विभागाचा कारभार संशयास्पद आहे. यापूर्वी देखील याच परिसरात एका कंपनीवर प्रदूषण मंडळाने कारवाई करीत वीज बंद करण्याचे आदेश दिले असताना देखील कारवाईस टाळाटाळ केली गेली होती. मात्र ग्रामस्थांच्या रेट्याने अगदीच काही तासांसाठी वीज बंद झाली होती. त्यामुळे या वेळेस देखील ग्रामस्थांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार कि अधिकारी त्यांची भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एरवी शेतकऱ्याच्या सर्व सामान्य नागरिकांच्या थकीत बिलावर वीज प्रवाह तात्काळ बंद करणारे अधिकारी, कर्मचारी धनदांडग्या पुढे लोटांगण घेत असल्याचे दिसून येत आहे.