विकीर

मी मराठी
घरी कोणी नसताना आणि काहीच प्लान ठरलेला नसताना दर दहा मिनिटांनी वाटत होत, घरच्यांचं अचानक ठरलं नसत तर काहीतरी प्लान केला असता. आता तर साला कोणी whatsapp ला पण रीप्लाय करणार नाही, बहुतेक सगळेच बिग बॉस बघत बसले असतील. अशावेळी बाईकच कामी येते…आईच्या कटकटीमुळे बाईक ऑफिसला घेऊन जाता येत नाही पण आईचं सीमा मावशीकडे काम असल की बरोबर बाईकवर सोडायला सांगणार… मी पण कधी कटकट केली नाही, एक तर सीमा मावशी सगळ्या मावश्यांमध्ये माझी आवडती मावशी, दोन म्हणजे तीनही मावश्यांपैकी सीमा मावशीचा रोहन माझ्या वयाचा बाकी सगळे माझे मावस भाऊ अजून छोटा भीमच्या प्रेमातून बाहेर न आलेले, आणि शेवटच नी महत्वाचं कारण म्हणजे सीमा मावशी शेजारी राहणारी रोहनची बेस्ट फ्रेंड, श्रीया…

असो ते नंतर कधीतरी… तिला आठवल कि माझा सलमान खान होतो, कधीही लग्न न करण्याचा विचार येतो मग मनात. बाईक काढली, गेट जवळचा वॉचमन नेहमी सलाम ठोकतो , तेव्हाच काय तो उर गर्वाने भरून येतो म्हणजे काय होत ते कळत. रस्त्याच्या मधून बाईक चालवताना (जे रात्रीचच शक्य असत) दोन्ही बाजूच्या street lamp मुळे बाईकची सावली बाईकच्या दोन्ही बाजूला पडते, मधें बाईक आणि दोन्ही बाजूला सावली; खूप आवडत मला ते … माझ्या कडून हरणारे काळे पिवळे डीवायडरवरचे पट्टे, साले किती हट्टी, हरतात तरी परत परत येतात…

फायनली, सिगरेट पिणाऱ्यांचा अड्डा आला, बाईक लावताना अन्नाने पाहिलं आणि म्हणाला – विकीर भैया, आज अकेला ही आये तु? रोहन अन्ना कीध्रेय ? मी – नही आज घरसे आया हू, रोहन उसके घर होगा… आमच हे बोलणं जस्ट आलेला एक मुलगा ऐकत होता. टपरी जवळची सगळी पोर त्याच्या निन्जा बाईककडे बघत होती , त्यामुळे वाटत जास्तच रुबाबात येत त्याने अन्नाकडे कॉफी मागितली … मला कॉफी देत असल्यामुळे अन्नाने त्याला – भैया एक मिनट हं , अस उत्तर दिल… निन्जावाल पोरगं चिडल ना,- मैं तेरे को भैया दिखाताय ? साले मराठी है मै…चल सॉरी बोल… वाद नको म्हणून अन्ना पण सॉरी बोल्ला. मग ह्याला जास्तच चेव आला , शेजारच्या पोरांमध्ये जाऊन पाजरायला लागला, मराठीची महती …

अन्नाला मी खूप आधी पासून ओळखतो, रोहनच्या घराजवळ अन्नाच इडलीच दुकान होत जे रस्त्याच्या कामाच्या वेळेस पाडलं… आता गाडीवर असतो त्याचा stall.

अन्नाला पैसे देताना त्याच्या गल्ल्याच्या लॉक जवळ मनसेच्या इंजिनचा स्टीकर पाहिला …

अन्ना hardcore शिवसैनिक होता सुरूवातीला …

पैसे देऊन निघालो, बाईक स्टार्ट करताना निन्ज्यावाल्या मराठी पोराची वाक्य कानी पडली …

एक पोरग, पल्सरवालं – कधी घेतली रे बाईक, के डी …

निन्जा वालं पोरग – DUDE, TWO WEEKS झाले असतील APPROX. …

मी हसलो,

संत ज्ञानेश्वरांची मराठी, अन्नाच्या कॉफीमध्ये बुडवून बुडवून निन्जावालं पोरग कडू करत होत…

काय बोलू कळेनाच …

मी मराठी कि… HAIL PASAYDANA !!!

                                                                                            क्रमश:

                                                                                                              © अविनाश उबाळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा