गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

भारताच्या तंत्रज्ञान प्रवासातील एक ऐतिहासिक पाऊल नुकतेच उचलले गेले आहे. स्वातंत्र्यदिनी दिलेल्या आश्वासनानुसार वर्षाअखेरीस पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप तयार होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते; मात्र त्यापूर्वीच भारताने “विक्रम ३२०१” नावाचा ३२-बिट मायक्रोप्रोसेसर सादर करून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नवा टप्पा गाठला आहे.

भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ सध्या २४ अब्ज डॉलरची असून पुढील पाच वर्षांत ती १२० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत भारताला तैवानसह विविध देशांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु “विक्रम ३२०१” मुळे केवळ आयात अवलंबित्व कमी होणार नाही, तर भारत निर्यातक्षम देश होण्याच्या दिशेनेही वाटचाल करेल.

हा प्रोसेसर इस्रो आणि चंदीगड येथील अर्धवाहक प्रयोगशाळेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. तो अवकाशातील कठोर वातावरणाचा सामना करण्यासाठी डिझाइन करण्यात आला असून -५५ अंश ते १२५ अंश सेल्सिअस तापमानातही कार्यक्षम राहतो. रॉकेट आणि प्रक्षेपण वाहनांमध्ये नेव्हिगेशन, नियंत्रण आणि मिशन व्यवस्थापनाची जबाबदारी तो सांभाळतो. विक्रम ३२०१ हा लष्करी दर्जाच्या मानकांनुसार तयार केला गेला असून कंपन, रेडिएशन यांसारख्या परिस्थितीतही तो सुरळीत कार्य करतो.

पूर्वी इस्रो विक्रम १६०१ या १६-बिट प्रोसेसरवर अवलंबून होता; मात्र विक्रम ३२०१ मध्ये ३२-बिट आर्किटेक्चर, ६४-बिट फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन, एडा प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी समर्थन आणि ऑन-चिप १५५३ बी बस इंटरफेस यांसारखी महत्त्वपूर्ण प्रगत वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. ही चिप केवळ ३.३ व्होल्ट पुरवठ्यावर चालते, ५०० मिलीवॉटपेक्षा कमी ऊर्जा वापरते आणि कठोर अवकाशीय परिस्थितीतही कार्यक्षम राहते.

या प्रोसेसरची पहिली यशस्वी चाचणी PSLV-C60 मोहिमेत घेण्यात आली. त्याने मिशन मॅनेजमेंट संगणकाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आणि भारताने अवकाशासाठी आवश्यक चिप्स बनवण्याची क्षमता जगासमोर सिद्ध केली. आता भारताला प्रोसेसरसाठी परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होईल.

सरकारने २०२१ मध्ये सेमीकंडक्टर मिशन सुरू केल्यानंतर सुमारे १.५६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशात पाच नवीन युनिट्स उभारली जात आहेत. डिझाइन-लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेमुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत आपले स्थान बळकट करणार आहे.

“विक्रम ३२०१” ही फक्त एक चिप नसून भारताच्या स्वावलंबनाचा पाया आहे. भविष्यात स्मार्टफोन किंवा संगणकांसाठी नव्हे तर उपग्रह, रॉकेट आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक उच्च तंत्रज्ञान भारतातच उपलब्ध होईल. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास हे यश निर्णायक ठरणार आहे.

भागा वरखडे

error: Content is protected !!
Exit mobile version