नाशिक, ७ जानेवारी २०२३ : भारतरत्न ग्रानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी (ता. सहा) प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जगभरातून आदरांजली अर्पण केली जात असताना तिरडशेत येथे त्यांच्या नावे उभ्या राहणाऱ्या आरोग्य केंद्र व रुग्णालयाला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या जागेचा वापर गावठाण विकासासाठी करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याने या केंद्राचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या इच्छेनुसार त्र्यंबकेश्वर रोडवरील तिरडशेत येथे गोरगरिबांसाठी; तसेच वृद्ध कलाकारांसाठी आरोग्य केंद्र व रुग्णालय उभारण्यात येणार आहे. स्वर माउली फाउंडेशनच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या या केंद्रासाठी तिरडशेतमध्ये पाच एकरचा शासकीय भूखंड देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली. त्यासाठी तिरडशेत येथील गट नंबर १९ मधील शासकीय जागा प्रशासनाने सुचविली.
त्यानंतर जागेचा प्रस्ताव प्रशासनाने मंत्रालयात अंतिम मान्यतेसाठी पाठविला; मात्र आरोग्य केंद्रावरून गावातच दोन गट पडले आहेत. एका गटाकडून आता या केंद्राला विरोध दर्शविला आहे. सदर जागेचा वापर हा गावठाण विकासासाठी करण्यात यावा, अशी मागणी करीत गावकऱ्यांनी निदर्शने केली आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर