मुंबई ८ जुलै २०२४ : आपल्या देशाच्या सीमा रक्षणाचे काम संरक्षण दलाच्या माध्यमातून आपले जवान करतात, तर देशांतर्गत सुरक्षेचे कार्य आपले कार्यतत्पर पोलीस, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या बोधवाक्याप्रमाणे अविरत आणि अहोरात्र करत असतात. पोलीस दलातील प्रत्येक जण आपले कार्य बजावत असताना आपल्या आरोग्याची चिंता न करता अहोरात्र कार्यरत असतो. अशाच पोलीस दलातील लोकांसाठी सदैव सामाजिक बांधिलकी जोपासत असलेल्या विमल अहिरे चॅरिटेबल ट्रस्टने एक अनोखा उपक्रम राबविलाय. मुंबई पोलीस दलातील पोलीस कमांडोंसाठी या संस्थेकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस कमांडो फोर्स मुंबई यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची ईसीजी टेस्ट, ब्लड शुगर टेस्ट, फुफुसांची चाचणी, क्षयरोग निदान तपासणी करून त्यांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि माहिती देण्यात आली. त्याच बरोबर डोळ्यांची तपासणी ही मोफत करण्यात आली. या शिबिरात शंभरहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला. या उपक्रमानंतर डॉक्टर चंद्रशेखर अहिरे यांनी मुंबई पोलीस दलाचे आभार मानले आहेत.कारण समाजामध्ये अहोरात्र सुरक्षेची सेवा देण्याचे कार्य पोलीस दल करत असते. याच पोलीस दलाला आरोग्य सेवा देण्याची संधी या माध्यमातून आम्हाला मिळाली, याचा आम्हाला अभिमान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर अहिरे यांनी सांगितले.
पुण्यातील उंड्री येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई कमांडो आरोग्य शिबिराचे आयोजन, विमल अहिरे ट्रस्ट कडून करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर अहिरे, डॉक्टर मनोज अहिरे, युवा उद्योजक जयेश कटके, मेजर भीमराव अहिरे, तुषार बुलाके, नोमी संदीप सोनवणे यांनी उत्तम प्रकारे आयोजन करून यशस्वीरित्या हा उपक्रम राबविला. नुकत्याच आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात विमल अहिरे चॅरिटेबल ट्रस्ट कडून सासवड येथे सुमारे २० हजार वारकऱ्यांना औषधांच्या किटचे वाटप करण्यात आलय.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर