विना परवानगी विवाह केल्याबद्दल वर पिता व वधू पित्या विरुद्ध गुन्हा दाखल

5

पुरंदर, दि. १८ जुलै २०२०: गावात कंटेनमेन झोन असताना व कोरोनाचे रुग्ण आढळले असतानाही शासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून गर्दी जमावत विवाह सोहळ्यास गर्दी जमावल्या प्रकरणी सासवड पोलिसांनी वधू व वर पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.या बाबतची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळे व दुःखद प्रसंगी लोकांनी एकत्रीत न येता २० लोकातच असे कार्यक्रम करावेत असा आदेश असताना व कन्टेनमेन. झोन मध्ये अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम करण्याची बंदी असताना देखील नियमांची पायमल्ली करत लग्न सोहळे केले जात आहेत.

पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी व वनपुरी या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतानाही शासनाची कोणतीही परवानगी न घेता दोन्ही गावांतील लोक बिनदिक्कत पणे विवाह सोहळा करत होते. मर्यादे पेक्षा जास्त लोक जमवून विवाह सोहळा करणाऱ्यांवर सासवड पोलीसांनी धडक कारवाई करत वर पिता व वधु पित्यांच्या विरुद्ध भादवि कलम १८८ व १६९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल शुक्रवार दि.१७ रोजी सासवड पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे उदाचीवाडी येथे विनापरवाना मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवून लग्न सोहळा चालू आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे सहकाऱ्यांसह उदाचीवाडी येथे गेले असता, तेथे लग्न सोहळा चालू असल्याचे, गर्दी असल्याचे व सोशल डिस्टसिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने वर पिता राहणार वनपुरी व वधू पिता राहणार उदाचीवाडी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी पुणे यांच्या लग्न सोहळा बाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

नागरिकांनी लग्नसमारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये विहित केलेल्या मर्यादेपलीकडे लोकांची गर्दी करू नये. अन्यथा अशा आयोजकांवर त्यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा