मुंबई : विनयभंगाचा आरोप असणारे नवी मुंबईचे उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे याला पदावरून निलंबित करण्यात आले आहे. मोरेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही कारवाई केली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी ५ जून २०१९ रोजी खारघरमध्ये तिच्या वाढदिवसासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डीआयजी निशिकांत मोरे सपत्नीक उपस्थित होता.
यावेळी आरोपी मोरे याने पीडित मुलीच्या शरीरावरील केक चाटला. याचा व्हिडिओ मोरेच्या पत्नीने काढला. यानंतर पीडितेने निशिकांत मोरे याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली.
संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी मोरे याने पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली होती, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले.
विशेष म्हणजे ही घटना होऊन ,५ महिने उलटूनही पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल न घेता गुन्हाही दाखल केला नव्हता.
२ दिवसापूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजूनही सापडली नसल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंकडे ड्रायव्हर असल्याचा दावा करणाऱ्या दिनकर साळवेने या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवले, असा आरोप तिच्या पालकांनी केला होता. याप्रकरणी ड्रायव्हरच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.