मणिपूर १३ जून २०२३: महिनाभरानंतरही मणिपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नसुन हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोमवारीही राज्यात हिंसाचार झाला, ज्यात एकाचा मृत्यू झाला आहे. परत एकदा अनेक जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला असून, लष्कर परिस्थिती हाताळत आहे. दुसरीकडे, मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटांनी स्पष्ट केले आहे की, ते गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या शांतता समितीच्या बैठकांना उपस्थित राहणार नाहीत.
सोमवारी झालेल्या हिंसाचाराला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. चुराचंदपूर जिल्ह्यातील लैलोइफोई भागात हा हिंसाचार झाला ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. हिंसाचारात आपला जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव एन मुएनसांग (२२) असे आहे, जो ग्राम संरक्षण स्वयंसेवक आहे.
५१ सदस्यीय शांतता समितीचे प्रमुख राज्यपाल उईके यांनी घटनेच्या दोनच दिवस आधी शनिवारी चुराचंदपूरला भेट दिली होती. हिंसाचार घडलेल्या भागात त्यांनी तीन मदत छावण्यांना भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात हिंसाचार सुरू झाल्यानंतर राज्यपाल हिंसाचारग्रस्त भागात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती.
राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी घटनेनंतर हिंसाचार पीडितांना पाठिंबा दिला आणि पीडित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. विस्थापितांना घरे देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच राज्य सरकार राज्यातील जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभे राहील आणि हिंसाचारात उद्ध्वस्त झालेली घरे पुन्हा बांधली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड