गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय फ्रान्समध्ये सलग पाचव्या दिवशी हिंसाचार जाळपोळ सुरुच, १३०० हून अधिक जण अटकेत

फ्रान्समध्ये सलग पाचव्या दिवशी हिंसाचार जाळपोळ सुरुच, १३०० हून अधिक जण अटकेत

पॅरिस, फ्रान्स ३ जुलै २०२३ : गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर पॅरिसमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यानंतर सरकार आणि पोलिस विरोधात फ्रान्समधील नागरिक आक्रमक झाले आहेत. पाचव्या दिवशीही मार्सेल शहरात पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. पॅरिसच्या उपनगरात वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी १७ वर्षीय नाहेल एम.नावाच्या मुलावर गोळीबार केला, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सरकार आणि पोलिसांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय. याविषयांवर बोलताना पोलिसानी सांगितले की, १७ वर्षीय नाहेल एम या मुलाने गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला.

या घटनेच्या निषेधार्थ नागरिक पॅरिस उपनगरात आणि फ्रान्समधील रस्त्यांवर उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांकडून गाड्यांची जाळपोळ, इमारती व दुकानांची लुटमार देखील सुरू आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आहे. गुरुवारी ९०० आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. तर शनिवार रोजी फ्रान्समध्ये सुमारे ४५ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पॅरिसमध्ये लुई व्हिटॉनसारख्या काही ब्रँडची दुकाने आंदोलकांकडून लुटण्यात येत आली. ‘झारा’, ‘ॲपल’ व ‘नायकी’ सारख्या ब्रँडच्या दुकानांमध्येही आंदोलकांनी लुटमार केली आहे.

फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा हिंसाचार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वासमोर या हिंसाचाराचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचारमुळे फ्रान्समधील सामजिक भेदभाव आणि संधीच्या अभावामुळे असंतोषाचा भडका झाल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नाएलवर शनिवारी नॉन्ते या ठिकाणी मुस्लीम धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला शनिवारी रात्री नाएलच्या मृत्यूचा आणि पोलिसांच्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी चॅम्प्स-एलिसीजवर एक छोटासा जमाव जमला होता, परंतु त्यांना हिंसाचार रोखण्यासाठी सज्ज असलेल्या कडेकोट बंदोबस्त ठेवणाऱ्या शेकडो अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले.

आंदोलकांनी पॅरिसच्या परिसरात फटाके फोडले आणि समोर येणारी अडथळे पेटवले. पोलिसांनी अश्रूधुर आणि ‘स्टन ग्रेनेड’ने जमावाला पळवले. तसेच पॅरिसच्या उपनगरातील महापौरांच्या घरावर जळती मोटार आंदोलकांनी धडकवली. गेल्या काही दिवसांत अनेक शाळा, पोलीस ठाणे, सभागृहे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले. प्रादेशिक तपासाधिकारी स्टीफन हाडर्ौइन यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, फ्रेंच वाहिनीला त्यांनी सांगितले, की या प्रकरणात महापौरांच्या हत्येचा हा प्रयत्न होता. प्राथमिक तपासानुसार पेटती मोटार महापौर निवासाला धडकवून आग लावण्याचा हल्लेखोरांचा हेतू होता. कारण मोटारीत एका बाटलीत ज्वालाग्राही पदार्थ सापडले आहे.

पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न हे गृहमंत्री गेराल्ड डरमानिन व इतर अधिकाऱ्यांसह महापौर जीनब्रून यांना भेटण्यासाठी गेले. आम्ही शक्य तितक्या लवकर सुव्यवस्था आणण्यासाठी सर्व काही करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. मॅक्रॉन हे रविवारी संध्याकाळी पंतप्रधान, गृहमंत्री आणि विधि मंत्र्यासह विशेष सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version