मणिपूरमध्ये हिंसाचार थांबत नाही, एका बीएसएफ जवानाचा मृत्यू तर दोन जवान जखमी

मणिपूर, ६ जून २०२३ : मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी असताना सोमवारी रात्री पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. यामध्ये एका बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने इंटरनेट बंदी १० जूनपर्यंत वाढवली आहे. राज्यात ३ मेपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात ३ मे रोजी दोन समुदायांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता, ११ जिल्ह्यांमध्ये अजूनही कर्फ्यू लागू आहे. मणिपूर सरकारने सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात असे सांगण्यात आले आहे की, इंटरनेट सेवा आणखी पाच दिवसांसाठी म्हणजे १० जूनच्या दुपारच्या ३ वाजेपर्यंत नेटवर बंदी असेल.

भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला आहे तर आसाम रायफल्सचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना विमानाने मंत्रीपुखारी येथे नेण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निवेदनानुसार, ५ – ६ जूनच्या रात्री दहशतवाद्यांकडून अधूनमधून गोळीबार करण्यात आला, ज्याला सुरक्षा दलांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला.

हिंसाचाराच्या दरम्यान, लष्कर, आसाम रायफल्स, पोलिस आणि सीएपीएफ यांनी शनिवारी संपूर्ण मणिपूरमध्ये क्षेत्र दान ऑपरेशन सुरू केले. यावेळी मोर्टार, दारूगोळा यासह ४० शस्त्रे जप्त करण्यात आली. यातील बहुतांश शस्त्रे स्वयंचलित होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा