मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाने कॅबिनेट मंत्र्यांचे सरकारी निवासस्थान पेटवले

मणिपूर १५ जून २०२३: मंत्री नेमचा किपगेन यांच्या इंफाळ पश्चिम येथील निवासस्थानाला बुधवारी आग लावण्यात आली. माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान सतत गस्त घालत आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत तेंगनौपल आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून बंदुक आणि ६३ राऊंड्स जप्त करण्यात आले आहेत.

मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १०४० शस्त्रे, १३६०१ दारूगोळा आणि २३० प्रकारचे बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा अधिकाऱ्यांनी कर्फ्यू शिथिलतेचे तास कमी करून, इंफाळ पूर्व जिल्ह्यात सकाळी ५ ते सकाळी ९ आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यात सकाळी ५ ते संध्याकाळी ६ अशी वेळ निश्चित केली आहे. मणिपूरच्या १६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू आहे, तर संपूर्ण ईशान्येकडील राज्यात इंटरनेट सेवा बंद आहे.

सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना आठ गावे जाळल्याचा अहवाल मिळाला आहे – गोवाजंग, सोंगजान, जॉर्डनफाई, थंबोल, आयगीजांग, पी फेनोम, खुइपुंग आणि छौलोफाई. या जाळपोळीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, गावातील घरे जाळल्याची संख्या १०० पेक्षा जास्त आहे. ३ मे रोजी प्रथमच जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून राज्य एका महिन्याहून अधिक काळ सामान्य स्थितीत परत येण्यासाठी संघर्ष करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा