हिंसाचारप्रेमी समाज मोजत आहे शेवटचे दिवस: मोहन भागवत

नवी दिल्ली, 30 एप्रिल 2022: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी सांगितलं की, हिंसाचारानं कोणाचाही फायदा होत नाही. हिंसाचारावर प्रेम करणारा समाज आता शेवटचे दिवस मोजत आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये अलीकडेच विविध गटांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व समुदायांना एकत्र आणण्यासाठी आणि मानवतेचे रक्षण करण्याची वकिली केली. भागवत म्हणाले, ‘हिंसेने कोणाचंही भलं होत नाही. आपण नेहमी अहिंसक आणि शांतताप्रिय असलं पाहिजे. यासाठी सर्व समाजाला एकत्र आणून मानवतेचं रक्षण करणं आवश्यक आहे. हे काम आपण सर्वांनी प्राधान्याने केलं पाहिजे.

सरकार असो वा इतर, समाजाच्या दबावावर काम करते

भागवत म्हणाले की, सरकार असो की अन्य कोणी, ते समाजाच्या दबावावर काम करते. सामाजिक दबाव हे सरकारसाठी पेट्रोलसारखे आहे. भागवत यांनी सिंधी भाषा आणि संस्कृतीचं अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी देशात सिंधी विद्यापीठाची स्थापना करण्याचं आवाहन केलं. आरएसएस प्रमुख म्हणाले की, भारत हा बहुभाषिक देश असून प्रत्येक भाषेचं स्वतःचं महत्त्व आहे.

यामुळे केलं हे विधान

वास्तविक, भाजपशासित मध्य प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवादरम्यान झालेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आरएसएस नेत्याचं हे वक्तव्य करण्यात आलं आहे. पूर्व महाराष्ट्रातील भानखेडा रोडवरील कंवरराम धाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजलाल मोरदिया यांच्या ‘गद्दीनशिनी’ कार्यक्रमात (धार्मिक आसन ग्रहण समारंभ) प्रमुख पाहुणे म्हणून भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला अमरावती जिल्ह्यातील आणि देशाच्या विविध भागातून सिंधी समाजाचे शेकडो लोक उपस्थित होते.

भागवत यांचे वक्तव्य नुकतेच आले

नुकतेच मोहन भागवत यांनी अखंड भारताबाबत मोठं वक्तव्य केलंय. सनातन धर्म हे हिंदु राष्ट्र असल्याचं संघाचे सरसंघचालक म्हणाले होते. ते म्हणाले, 20 ते 25 वर्षात भारत अखंड भारत होईल. पण थोडा प्रयत्न केला तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत 10 ते 15 वर्षात साकार होईल. ज्याप्रमाणं भगवान श्रीकृष्णाच्या बोटाने गोवर्धन पर्वत उभा करण्यात आला, त्याचप्रमाणं संतांच्या आशीर्वादाने भारत लवकरच पुन्हा अखंड भारत बनेल, असे आरएसएस प्रमुख म्हणाले होते. याला कोणी रोखणार नाही, पण सर्वसामान्यांनी थोडे प्रयत्न केले तर स्वामी विवेकानंद महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत 10 ते 15 वर्षात साकार होईल.

संघप्रमुख म्हणाले की, भारत असा देश आहे जिथं जगातील प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीच्या वाईट प्रवृत्तींचा अंत होतो. भारतात आल्यावर तो एकतर बरा होतो किंवा नष्ट जातो. ते म्हणाले की, भारतातील सनातन धर्म संपवण्यासाठी हजारो वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न केले जात होते. पण हा प्रयत्न करणारेच नाहीसे झाले, पण आपण आणि सनातन धर्म आजही अस्तित्वात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा