विराटनं चाहत्यांना दिला अजून एक धक्का, आयपीएल 2021 नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणार

पुणे, 20 सप्टेंबर 2021: टी 20 विश्वचषकानंतर टी 20 आंतरराष्ट्रीय मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणाऱ्या विराट कोहलीने काल आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. विराटने आपल्या चाहत्यांना अजून एक धक्का दिला आहे. आता आरसीबीचे (RCB) कर्णधारपदही यंदाच्या आयपीएलनंतर सोडणार असल्याचं त्यानं जाहीर केलं आहे. कोहलीने जाहीर केले आहे की, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर आपण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडणार आहे.


सोमवारी (20 सप्टेंबर) आयपीएलच्या उर्वरीत पर्वातील आरसीबीचा पहिलाच सामना केकेआर संघाविरुद्ध (RCB vs KKR) असणार आहे. विशेष म्हणजे हा कर्णधार विराटचा आरसीबीसाठी 200 वा सामना असणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच विराटने कर्णधारपद पर्व संपल्यानंतर सोडणार असल्याची घोषणा केली आहे. आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये विराटने ही माहिती दिली आहे.


आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली. विराट म्हणाला, ”आज संध्याकाळी मी संघाशी बोललो, की कर्णधार म्हणून ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा असेल. मी संघ व्यवस्थापनालाही याबाबत माहिती दिली आहे. हे माझ्या मनात बराच काळ चालले होते. अलीकडेच मी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. जेणेकरून मी कामाचा ताण व्यवस्थापित करू शकेन.”


कोहलीचा कर्णधार म्हणून आरसीबीसाठी अत्यंत खराब रेकॉर्ड होता. तो 2013 पासून कर्णधारपद सांभाळत आहे पण एकदाही सांघिक विजेतेपद पटकावू शकला नाही. 2016 नंतर, आरसीबीचा संघ गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये पात्र ठरला होता. 2017 आणि 2019 मध्ये तो गुणतालिकेच्या तळाशी होता तर 2018 मध्ये संघ सहाव्या स्थानावर होता. 2016 चा हंगाम कोहलीसाठी उत्तम होता, त्या काळात त्याने 973 धावा केल्या. त्यानंतर केवळ 2018 मध्ये कोहली 500 धावांच्या पुढे पोहोचू शकला. आयपीएल 2021 च्या हंगामात त्याने सात सामन्यांत 33 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, ज्यात फक्त एक अर्धशतक आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा