पुणे, ३० ऑगस्ट २०२३ : आशिया चषक २०२३ आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आज पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. २ सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची ठरू शकते.
आशिया चषकादरम्यान तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. आशिया कपच्या माध्यमातून विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १३ हजार धावा पूर्ण करू शकतो. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला १०२ धावांची गरज आहे. कोहलीने आतापर्यंत २६५ एकदिवसीय डावात १२८९८ धावा केल्या आहेत. आणि सचिन तेंडुलकरने ३२१ एकदिवसीय डावात १३,००० धावा केल्या.
आशिया चषकात भारत पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याची माहिती आहे. कोहलीच्या बॅटने पाकिस्तानविरुद्ध नेहमीच चांगल्या धावा केल्या आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १३,००० धावा करणारा खेळाडू बनू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८०००, ९०००, १०,०००, ११,००० आणि १२,००० धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड