विराट कोहलीचा मोठा निर्णय, T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार!

8
मुंबई, 17 सप्टेंबर 2021: टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. कोहलीनं स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेषत: आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्यानं सविस्तर लिहिलं आहे.
विशेष म्हणजे विराट कोहली केवळ टी 20ची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान आपल्या पत्रामध्ये विराट कोहलीनं त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीनं पत्रात म्हटलं आहे.
या पत्रामध्ये विराट कोहलीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट म्हणतो, “फक्त भारतीय संघामध्ये सहभागी व्हायचीच नाही, तर भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची देखील संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला सुदैवी समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो”.
विराट पत्रात पुढे म्हणतो, “आपल्यावर असणारा ताण समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि गेल्या ८ ते ९ वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमसाठी तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, कसोटी, एकदिवसीय) आणि गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने कर्णधारपद सांभाळताना मला आता वाटू लागलं आहे की मी स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळं काही संघाला दिलं आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा