तुम्हाला बाबासाहेब समजून घ्यायचे असतील, तर तुम्हाला आधी मनुस्मृती आणि त्यावर या देशातील हजारो वर्षे चालवली गेलेली सामाजिक व्यवस्था समजून घ्यावी लागेल. तुम्हाला वर्णवाद समजून घ्यावा लागेल. तुम्हाला मनुवाद समजून घ्यावा लागेल.
तुम्हाला बाबासाहेब समजुन घ्यायचे असतील तर तुम्हाला या देशातील जातीव्यवस्था आधी समजून घ्यावी लागेल. अमुक एका जातीचे आहात म्हणून शिक्षणाचा अधिकार नाकारणारा, सत्तेमधील वाटा नाकारणारा, व्यवस्थेमधील वाटा नाकारणारा आणि माणसाला माणूस म्हणून देखील न समजणाऱ्या मनुवादी व्यवस्थेचा इतिहास समजून घ्यावा लागेल.
तुम्हाला बाबासाहेब समजून घेण्याआधी ज्या जातीचे आहात त्याच जातीचे काम पूर्वापार करत राहण्याचा मनुवादी कायदा आधी समजून घ्यावा लागेल. हातातील लेखणी सोडून मेलेलं जनावर उचलाव लागेल, त्याच चामड काढाव लागेल, संडास साफ करावं लागेल, आणि हे काम तुम्ही एका जातीचे आहात म्हणून तुम्हाला करावं लागतंय हे जेंव्हा तुम्हाला समजेल ना, मग बाबासाहेब समजायला तुम्हाला सोपे जातील. आणि फाईव्ह स्टार हॉटेलात देखील ‘जय भीम’ म्हणायला तुम्हाला लाज वाटणार नाही.
हल्ली चहाच्या टपरीवर एखाद्याला ‘जय भीम’ म्हणाल, तरी एखाद्याला लाज वाटते. त्याला अस्वस्थ होतं. तोंड बारीक होत. आजूबाजूला कोण त्याच्याकडे बघत की काय याचाच तो विचार करतो. कुठल्याही एका जातीच्या किंवा धर्माच्याच लोकांनी जयभीम म्हणावं हा शुद्ध मूर्खपणा आहे. एकेकाळी अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्यांनी आरक्षणाची मलाई खाऊन देखील, सामाजिक दाबावाचा मनुवाद अजूनही आपल्या मानगुटीवर बसवून घेतला आहे. तो दबाव घालवायचा असेल ना तर आणि तरच ‘जय भीम’ म्हणा. आणि नसेल म्हणायचं तर तुम्ही सरकारी नोकरीत कोणामुळे आहात ? हा प्रश्न एकदा स्वतःला विचाराच.
बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं ? जी वर्णव्यवस्था हजारो वर्षांच्या प्रबोधनाने संपली नाही. ती वर्णव्यवस्था बाबासाहेबांनी संविधान देऊन संपवली. फक्त संपवली नाही तर एक व्यवस्थाच निर्माण केली. मनुवादावर जबरदस्त घाव म्हणजे संविधान. तो घाव समजुन घ्या…
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुलेंचे स्वप्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्षात उतरवले. महात्मा जोतिबा फुले त्यांच्या वाङमयात म्हणतात,
बंधू आर्य राया दयावान व्हावा ||
जाळून टाकावा || मनुग्रंथ ||
आणि याच मनुग्रंथाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
“आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे कि, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्या विषयी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत…त्यात धर्माची धारणा नसून, त्यात धर्माची विटंबना आहे आणि समतेचा मागमूस नसून, समतेची मात्र धुळवड घातली आहे, स्वयं निर्णयाचे तत्व प्रस्थापित करण्यास निघालेल्या सुधारणावाद्यांस असला ग्रंथ कधीच मेनी होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही, एवढेच दर्शविणेकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली…
-विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
(संदर्भ-बहिष्कृत भारत, दि. ३ फेब्रुवारी १९२८)
२५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाळली. फक्त मनुग्रंथ जाळूनच बाबासाहेब थांबले नाही तर २६ नोव्हेंबर १९४९ ला भारताचे संविधान ही नवीन व्यवस्था देशाला दिली. जगाच्या पाठीवर हे बहुदा एकमेव उदाहरण असावे. आणि याचा मतदान करत असलेल्या प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगायला हवा.
बाबासाहेबांचे उपकार या देशातील बहुजन समाज युगानुयुगे विसरणार नाही. पण हा इतिहास बहुजन समाजा पर्यंत पोहोचला पाहिजे. तो पोहोचत नाही म्हणून बाबासाहेब आम्हाला समजत नाही.
बाबासाहेबांसारखा बहुजन नायक या मातीत जन्मला यासाठी बहुजनांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बाबासाहेबांची जयंती घरोघरी साजरी झाली पाहिजे. या महामानवामुळेच आज तुम्ही व्यवस्थेत आहात. आता ही व्यवस्था टिकवून ठेवायचं काम देखील तुमचंच आहे. या व्यवस्थेला लोकशाही मार्गाने चिकटलेले हे बांडगुळ काढून फेकणे हे प्रत्येक समाजातील भीम सैनिकाचे आद्य कर्तव्य आहे. बाबसाहेबांसारखा स्वाभिमान जागा असलेला माणूस जन्मायला हजारो वर्षे जातात. मग जे दिलंय टिकवून ठेवा. नाहीतर बसा बोंबलत.
जय भीम, जय भीम, जय भीम…
- पैगंबर शेख