पुणे २८ सप्टेंबर २०२४ : पुण्यातील प्रसिध्द चतुश्रृंगी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त देवीला मोती आणि सुवर्णाच्या नथीचा साज चढविण्यात येणार आहे. यंदा दर्शन बारीतील भाविकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे व्हीव्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. चतु:श्रृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमित अनगळ व कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मंदिर परिसरातील नवरात्रीची कामे पूर्णत्वास गेली असून नवरात्रात भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. दाेन काेटी रुपये खर्च करुन मंदिराचे जीर्णाेध्दराचे काम झाले असून उर्वरित बांधकाम व परिसराचे सुशाेभीकरण पुढील आठ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. नवरात्रात दहा लाख भाविक मंदिरात देवीच्या दर्शनास येणे अपेक्षित आहे. भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा दाेन काेटीचा विमा काढण्यात आला आहे. काेणतीही दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त भाविकांना विम्याचे कवच देण्यात येईल, असे अनगळ म्हणाले.
‘नवरात्र काळात घटस्थापना, नवचंडी हाेम, अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण, भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम हाेणार आहेत. दसऱ्याच्या दिवशी १२ ऑक्टाेबर राेजी सायंकाळी पाच पासून सीमाेल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढाेल लेझीम, नगारा, चाैघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेकऱ्यांचे सहभागातून काढण्यात येईल, हेलिकाॅप्टर मधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येईल, यंदा पालखीच्या मिरवणुकीत कलावंत ढाेल ताशाचे पथक हे प्रमुख आकर्षण असेल. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील कलावंत सहभागी हाेतील. तसेच २५ लाेक शंखनाद करणार आहेत. यंदा देवीच्या मुख्य मंदिरातील सभामंडपाचे काम पूर्ण झाले नसले तरी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल. तसेच नवीन सभामंडप पूर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने माेठा झाला आहे. एक भाविक घटस्थापना दिवशी देवीला साेने व माेत्याची तीन लाख रुपये किंमतीची नथ उत्सवात अर्पण करणार आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पाेलीस दल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसरात जागाेजागी २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुध्द सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक काम करणार आहेत. ग्रीन हिल्स ग्रुपच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टने देवळामागील डाेंगरावर १२ हजार राेपे लावली असून त्याची जाेपसना करण्यात येत आहे. त्यास लागणाऱ्या खताची निर्मीती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून करण्यात येत आहे. युवराज तेली मेमाेरिअल ट्रस्टतर्फे भाविकांसाठी कार्डियाक रुग्णवाहिकाची साेय करण्यात आली आहे. तसेच २४ तास दाेन डाॅक्टर व त्यांना सहाय्य करणारे असा नऊ जणांचा वैद्यकीय स्टाफ तैनात करण्यात आला आहे. मंदिर व परिसरात सुशाेभीकरण, विद्युत राेषणाई करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केली आहे. तसेच मंदिर परिसरात ऑफलाईन दर्शनासाठी तीन काऊंटरची व्यवस्था असेल, असे अमित अनगळ म्हणाले
न्युज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील