व्यापार्‍याच्या खुनाचा एका दिवसात पर्दाफाश

पुणे : व्यावसायिक चंदन शेवानी यांचा खून खंडणीसाठी नव्हे, तर अन्य कारणासाठी झाला असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सातारा पोलिसांच्या मदतीने अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली आहे.

आफ्रीदी रौफ खान (वय २३, रा.नाना पेठ) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्यास पंधरा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. फिर्यादी यांचे भाऊ गोविंद शेवानी (वय ५७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेवानी यांचे लक्ष्मी रस्त्यावर पादत्राणे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री ते त्यांचे दुकान बंद करुन त्यांच्या कारने घरी जात होते.
त्यावेळी अनोळखी व्यक्तींनी त्यांचे मालधक्का चौकातील दुर्गा रेस्टॉरंटसमोरून अपहरण करुन खंडाळ्यातील पाडेगाव येथे नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला.

दरम्यान, सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने शेवानी यांच्या खून प्रकरणामध्ये नाना पेठेत राहणाऱ्या खान यास अटक केली. शेवानी यांचा खून करण्यामागील उद्देश, त्याचे साथीदार याबाबतची माहिती पोलिस त्याच्याकडून मिळवित आहेत.

संबंधित प्रकरण हे खंडणीवरुन झाले नसल्याची माहिती प्राथमिक तपासामध्ये पुढे येत आहे. मात्र आरोपीची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे व अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा