रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘वेड’ रिलीज

24

लातूरच्या सुपुत्राची कलाकृती पाहण्यासाठी लातूरकरांची उत्सुकता शिगेला; सर्वच शो हाऊसफुल्ल

पुणे, ता. ३१ डिसेंबर २०२२ : लातूरचे सुपुत्र सुप्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख व सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख यांचा मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनलरखाली बनलेला ‘वेड’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी (ता. ३० डिसेंबर) संपूर्ण राज्यभरात रिलीज झाला. लातूरच्या ‘पीव्हीआर’मध्येही रितेश-जेनेलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूरकरांच्या उदंड प्रतिसादात ‘वेड’ चित्रपट रिलीज करण्यात आला. रितेश-जेनेलिया यांना पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. सळसळत्या तरुणाईने आपल्या लाडक्या रितेशला भरभरून प्रेम दिले.

चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात आपली खास एंट्री करीत रितेश देशमुख यांनी आपली आगळीवेगळी दिग्दर्शन शैली दाखवून दिली. रितेश यांचे दिग्दर्शनात आणि जेनेलिया यांचे मराठी सिनेमात पदार्पण असा दुग्धशर्करा योग ‘वेड’च्या निमित्ताने जुळून आला. तो चित्रपट रसिकांनी आज पहिल्याच ‘शो’मधून अनुभवला. तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन रितेश-जेनेलिया शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता लातूरच्या पीव्हीआर सिनेमागृहात पोचले. रितेश-जेनेलिया येणार असल्याने ‘पीव्हीआर’च्या परिसरात आधीच तरुण-तरुणाईची गर्दी उसळली होती. रितेश-जेनेलिया ‘पीव्हीआर’ मध्ये येताच तरुणाईने एकच जल्लोष केला.

रितेश यांनी आपल्या खास अंदाजात हात उंचावून उपस्थित तरुणाईला प्रतिसाद दिला. त्यावेळी तर उत्साहाला एकच उधाण आले. प्रचंड गर्दी, उत्साह आणि आपल्या लाडक्या अभिनेत्याबद्दल असलेली उत्कंठा शिगेला पोचली होती. यावेळी रितेश यांच्या मातोश्री विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, श्रीमती विजयाताई देशमुख, श्री व सौ. जयसिंहराव देशमुख, शेतकरी नेते विनायकराव पाटील, अभिजित देशमुख, डॉ. सारिका देशमुख व देशमुख कुटुंबीय ‘पीव्हीआर’मध्ये पोचले. रितेश-जेनेलिया यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत व लातूरकरांच्या उदंड प्रतिसादात ‘वेड’ चित्रपट संपूर्ण पाहिला.

‘लातूरकरांच्या उदंड प्रेमाने भारावून गेलो’
लातूरकरांनी देशमुख कुटुंबीयांना नेहमीच भरभरून प्रेम दिलेले आहे. आजही ‘वेड’ चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने लातूरकरांनी दिलेले प्रेम पाहून मी भारावून गेलो. मी दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ चित्रपटाला लातूरकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादासारखाच प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळत आहे. २० वर्षांपूर्वी माझा आणि जेनेलिया यांचा ‘तुझे मेरी कसम’ हा पहिला चित्रपट रिलीज करण्यासाठी आम्ही आलो होतो. त्यावेळी जे प्रेम लातूरकरांनी दिले, तेच प्रेम पुन्हा मिळाले आहे, असे रितेश देशमुख यांनी सांगितले.

मराठी चित्रपटाचा आनंद वेगळाच : जेनेलिया देशमुख
मी हिंदीसह इतरही अनेक भाषांत चित्रपट केले आहेत. परंतु मी दिग्दर्शन केलेला ‘वेड’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रपटाचा आनंदच वेगळा आहे. या चित्रपटाला बाभळगाव आणि लातूरकरांनी दिलेला प्रतिसाद कधीच विसरता येणार नाही, असे जेनेलिया म्हणाल्या.

खूप आनंद झाला : श्रीमती वैशालीताई देशमुख
रितेश-जेनेलिया यांचा ‘वेड’ चित्रपट पाहिला. खूप आनंद झाला. चित्रपट पाहण्यासाठी लातूरकरांसह आम्ही सर्वजण एकत्र आलो. देशमुख कुटुंबीय, नातेवाईक आणि लातूरकरांनी उपस्थित राहून प्रेमासोबतच आशीर्वादही दिले. लातूरकरांच्या आशीर्वादात खूप मोठे सामर्थ्य आहे. ते रितेश-जेनेलिया यांना मिळाले. त्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात आणखी खूप प्रगती करतील, असे श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख म्हणाल्या.

‘वेड’ चित्रपटाचे सर्वच शो हाऊसफुल्ल
‘वेड’ चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आणि सर्वच शो हाऊसफुल्ल झाले आहेत. अगदी सकाळी ७ वाजतासुद्धा शो हाऊसफुल्ल झाला. लातूरच्या सुपुत्राची कलाकृती पाहण्यासाठी लातूरकरांची उत्सुकता शिगेला पोचली होती. त्यामुळे या चित्रपटाचे सर्वच शो हाऊसफुल्ल झाले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा