नागपूर, ९ ऑगस्ट २०२३ : विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह विदर्भातील राजकारणावर सविस्तर चर्चा केली आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवरही चर्चा केली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे विदर्भात भाजपचा विजय रथ रोखण्याचे काम करण्यात आले, त्याचप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी करण्याचे काम केले जाईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केला.
संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या लाटेचे भांडवल करण्यासाठी संपूर्ण एकजुटीने काम करण्याची गरज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ चंद्रपूरची जागा जिंकल्याचा बदला घेत, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विदर्भात आता काँग्रेसच्या जागा दुहेरी आकडी करणार आहेत. असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केल्याचे कळते.
चंद्रपूरमधून बाळू धानोरकर यांच्या विजयात विजय वडेट्टीवार यांचाही महत्त्वाचा वाटा होता. वडेट्टीवार यांचा ओबीसी समाजात बराच प्रभाव आहे. काँग्रेसने चंद्रपूरसारख्या मागास भागातून आलेल्या नेत्याची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे मनोबल उंचावले आहे. विदर्भातील निवडणुकीत चांगले निकाल लागावेत, या रणनीतीअंतर्गत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्यावर विश्वास व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही नागपूर, रामटेक आणि गोंदिया-भंडारा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड