गोल पोस्ट महाराष्ट्र काही काळ थांबा तुम्हाला वेगळे चित्र दिसेल, शरद पवारांविषयी चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

काही काळ थांबा तुम्हाला वेगळे चित्र दिसेल, शरद पवारांविषयी चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक विधान

परभणी, ३० जुलै २०२३ : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला आहे. तर दुसरा गट अजुनही महाविकास आघाडीत आहे. शरद पवार यांनी भाजपसोबत यावे म्हणून अजितदादांच्या गटाकडून दोन वेळा त्यांची मनधरणी करण्यात आली. परंतु शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता आहेच, पण भाजपमध्येही अस्वस्थता आहे. अजितदादा सोबत आल्याने बळ वाढले असले तरी शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते भाजपची खेळी कधीही उधळवून लावू शकतात, हे भाजपलाही माहीत आहे. त्यामुळेच भाजपचे टेन्शन वाढलेले आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर बोलताना सावध आणि सूचक विधाने केली जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार भाजपसोबत येणार का? यावेळी बावनकुळे यांनी सावध आणि सूचक विधान केले. शरद पवार भाजप सोबत येणार हे आज सांगणे योग्य होणार नाही. काही काळ थांबा वेगळे चित्र तुम्हाला दिसेल, असे सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष असल्याचा आरोप केला आहे. त्यावर ते म्हणाले. आम्ही कधीही कोणाचा पक्ष फोडत नाही. कधी कोणाच्या पक्षात आम्ही डोकावत नाही. आमच्याकडे कोणी आला तर कमळाचा दुपट्टा तयार आहे. कोणीही आले तर आम्ही पक्ष प्रवेश देण्यासाठी तयार आहोत. फोडाफोडीचा उद्योग राज्यात उद्धव ठाकरे यांनी सुरू केला. पक्ष फोडणे आणि पाठीत खंजीर खुपसणे हे उद्धव ठाकरे यांच्या रक्तात आहे, असा हल्ला बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरेंकडे २०२४ पर्यंत केवळ चारच लोक राहतील. बाकीचे सर्व एकनाथ शिंदेंकडे जातील. काही भाजपकडे येतील. त्यामुळे २०२४ ला शिल्लक सेना शून्य होणार आहे. उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा पक्ष सांभाळावा. लोक सोडून चालले त्याकडे लक्ष द्यावे. फेसबुक लाइव्ह करणे, घराच्या घरात इंटरव्ह्यू देणे यापेक्षा उद्धव ठाकरे लोकांमध्ये गेले तर त्यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

ज्याप्रकारे उद्धव ठाकरे वागत आहेत. अजूनही त्यांना महाराष्ट्र कळलेला नाही. ९ वर्षात मोदीजींनी देशासाठी जे केले, एकनात शिंदे, फडणवीस आणि अजितदादा १३ कोटी जनतेसाठी जे विकासाचे काम करत आहेत त्यामुळे पक्षप्रवेश होत आहे. ज्याप्रकारे भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे त्याची उद्धवजींनी चिंता केली पाहिजे. लोक आमच्याकडे आले तर आम्ही घेणारच. आम्ही काही संन्याशी नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version