मुंबई, दि. ७ जुलै २०२०: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा आज ३९ वा वाढदिवस आहे. जगभरात असलेल्या चाहत्यांकडून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मुंबई पोलिसांनी महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच, पण धोनीप्रमाणे नॉट आऊट राहण्याचा सामाजिक संदेशही दिला आहे.
सध्या कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊन सुरु आहे. संपूर्ण देशाचा विचार केला असता महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णसंख्या सर्वात जास्त आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह मुंबई पोलिसही मोठं योगदान देत आहे. कोरोना संबंधित जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
आज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यात त्यांनी सांगितले कि, Do it the ‘Mahi Way’ – Stay ‘Not Out’, Stay Cool & Stump. Happy Birthday, Captain Cool. म्हणजेच – माहीच्या मार्गाने चाला, कोरोनापासून सुरक्षित रहा,कोरोनापासून नॉट आऊटरहा. त्याचप्रमाणे MSD म्हणजे ”maintain social distancing” “सामाजिक अंतर ठेवा” असे आवाहनही मुंबई पोलीसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या या क्रिएटिव्ह शुभेच्छा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या असून त्यांना शेकडो रिट्विट्स आणि हजारो लाईक्स मिळत आहे. एकूणच माहीच्या वाढदिवसाची संधी साधून जनजागृती करण्याचा हा प्रयत्न अनेकांना आवडला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे