७ मे २०२५ रोजी पुणे शहरात एक महत्त्वपूर्ण मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) निर्देशानुसार होणाऱ्या या युद्धाभ्यासामुळे शहरात काही काळासाठी सतर्कतेचा सायरन वाजणार आहे. नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळणीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि प्रशासकीय यंत्रणेची तयारी तपासणे हा या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश आहे.
या मॉक ड्रिलमध्ये युद्धजन्य परिस्थिती, तसेच इतर संभाव्य आपत्कालीन स्थितीत काय उपाययोजना कराव्यात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले जाणार आहे. शहराच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या वेळी सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेश दिला जाईल. या दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखण्याचे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात या मॉक ड्रिलसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस संयुक्तपणे या कार्यवाहीचे नियोजन करत आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके तयार ठेवण्यात आली आहेत. या मॉक ड्रिलमध्ये केवळ सायरन वाजवणेच नाही, तर रुग्णालये, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक सेवा कशा प्रकारे समन्वय साधतात, याचेही परीक्षण केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, या मॉक ड्रिलमध्ये पुण्यातील काही निवडक भागांमध्ये प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक देखील आयोजित केले जाईल. यात इमारतीमधून लोकांना सुरक्षित बाहेर काढणे, जखमींना प्रथमोपचार देणे आणि तात्पुरते निवारा केंद्र उभारणे अशा कृतींचा समावेश असेल. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
पुणे पोलिसांनी या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काही मार्गांमध्ये बदल केले जाऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
या मॉक ड्रिलच्या माध्यमातून पुणे शहर आपत्कालीन परिस्थितीत अधिक सक्षमपणे सामना करण्यासाठी सज्ज होत आहे, हे निश्चित! त्यामुळे उद्या जर तुम्हाला सायरनचा आवाज ऐकू आला, तर तो केवळ एक युद्धाभ्यास आहे, याची नोंद घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहा.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे