कदमवाकवस्ती, दि. १७ जुलै २०२०: लोणी काळभोर या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत मागिल पंधरा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हद्दीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभागनिहाय सर्वेक्षण करुन उपाययोजना करण्याचे धोरण आरोग्य विभाग व कदम वाकवस्ती, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आखण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने तयार केलेल्या उपाययोजने अंतर्गत प्रभागनिहाय शंभर टक्के कुटुंबांचे व कुटुंबांतील सदस्यांचे सर्वेक्षण, सर्दी- खोकला- ताप अशी लक्षणे असणारे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व मित्रमंडळी अशा सर्वांचीच यादी तयार करणे, कोरोनाबाधित रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्याना कोविड केअर सेंटरपर्यंत पोचवणे, आदी कामे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांच्या मदतीने केली जाणार आहेत. या दोन्ही ग्रामपंचायती पुढील दहा दिवसांत कोरोना मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांच्या मदतीने प्रभागनिहाय कोरोनामुक्त करण्याचे नियोजन केले आहे.
यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत आरोग्य विभागाने कदमवाकवस्ती येथील मधुबन मंगल कार्यालयात दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनाची बैठक बोलवली होती. यावेळी हवेली पंचायत समिती उपसभापती युगंधर काळभोर, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, तलाठी दादासाहेब झांजे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय पवार, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब काळभोर, लोणी काळभोरचे उपसरपंच राजाराम काळभोर, आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, गणेश गायकवाड तसेच सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे