मुंबई, दि. १५ जुलै २०२०: कालपासून मुंबई मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री पावसाचा जोर कमी झाला होता त्यामुळे पाऊस ये-जा करत होता आता अशातच हवामान खात्याने आज १५ जुलै रोजी मुंबई मध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये मोठी भरती येण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. मुंबईत सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार भरतीची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या काळात समुद्रात ३ मीटरपेक्षा जास्त लाटा उसळू शकतात. भरतीसंबंधीचा इशारा बघून लोकांना महापालिकेने सतर्क केले आहे. मुसळधार पावसामध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये तसेच भरतीच्या वेळेला कोणीही समुद्राजवळ जाऊ नये अशी चेतावणी महानगरपालिकेने लोकांना दिली आहे.
मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिक ठिकाणी पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. साठलेल्या पाण्यामुळे लोकांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे. साठलेल्या पाण्यामुळे रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे वाहतुकीसाठी देखील समस्या भेडसावत आहेत. यातच आता आज सायंकाळी सात वाजता पुन्हा मुसळधार पावसाची चेतावणी दिली गेली आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये मोठी भरती देखील येणार आहे.
गेल्या २४ तासांविषयी बोलायचे झाल्यास बर्याच भागात १६० मिमी पाऊस पडला आहे. मुंबईच्या बर्याच भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडतो. या आठवड्यात हा पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. पावसामुळे अधिक भागात पाणी साचले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी