रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते का? राज ठाकरेंनी दिलं हे उत्तर

औरंगाबाद, 2 मे 2022: शिवाजी महाराजांचे गुरु कोण? यावरून राज्यात अनेक वेगवेगळी मतं आहेत. विशेष करून रामदास स्वामी यांना काही लोक शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही यावरून राज ठाकरे यांनी काल आपल्या सभेत स्पष्ट मत मांडलं. काल औरंगाबाद मध्ये झालेल्या सभेत त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. रामदास स्वामी यांनी एका ठिकाणी लिहिताना शिवाजी महाराजांना माफ करा असं लिहिलं आहे. कोणता गुरू शिष्याला माफ करा असं लिहितो? असा सवाल करत राज ठाकरे यांनी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांमध्ये गुरू-शिष्याचं नातं नसल्याचं म्हटलं.

राज ठाकरे म्हणाले, “रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात का? रामदास स्वामी कधी बोलले होते का की ते शिवाजी महाराजांचे गुरू आहेत म्हणून. शिवाजी महाराज कधी बोलले का की रामदास स्वामी माझे गुरू होते? गुरू-शिष्याच्या नात्याचा काही संबंधच येत नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबद्दल जे लिहून ठेवलं आहे तेवढं उत्कृष्ट शिवाजी महाराजांवर लिहिलेलं मी कधीही वाचलेलं नाही.”

“रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय की निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी. त्यातील शेवटच्या तीन ओळी वाचून दाखवतो. ‘तुमच्या देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंध विस्मरण झाले, काय नेणू. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती काय सांगणे तुम्हाप्रती, परी धर्म संस्थापनेची किर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले, तेणे चित्त विभागिले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे’,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“कोणता गुरू शिष्याला माफ करा असं लिहितो?”

“रामदास स्वामी छत्रपतींना सांगत आहेत की क्षमा केली पाहिजे. मी तुम्हाला लिहिलं आहे, पण मला माफ करा. गुरू शिष्याला असं लिहितो? कुठल्या शाळेचा शिक्षक आहे मला दाखवा. मी इतके वर्षे शिकलो, मला आठवत नाही कुठल्या शिक्षकाने माझी माफी मागितली. ही माफी नाही, यात प्रेम आहे. या जातीपातीच्या विषापासून तुम्ही सर्वांनी दूर राहणं गरजेचं आहे,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा