कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, जिल्ह्यात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट

9

कोल्हापूर, २० जुलै २०२३ : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून काही जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु आहे. काल रात्री रायगडमधील खोपोली जवळ इर्शाळवाडी गावात दरड कोसळली आहे. त्यामध्ये ४० ते ५० घरे त्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. सध्या त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम आणि पोलिस मदतकार्य करीत आहे. ही घटना रात्री अकरा वाजता घडली असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री उदय सामंत,गिरीश महाजन हे त्या गावात दाखल झाले आहेत. २५ हुन अधिक लोकांना ढिगाऱ्यातून काढण्यात यश आले आहे.

मागील दोन दिवसापासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे त्या भागातल्या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. रात्रीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तीन फुटांची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बांधाऱ्यावरील पाणी पातळी २२ फुटावर आहे. राजाराम बंधाऱ्यासह ११ बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ होत आहे. राधानगरी धरणातून ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे वारणा नदी ओसंडून वाहत आहे. कृष्णेची पातळी ही वाढू लागली आहे. दुसरीकडे जिल्ह्याचा पूर्व भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बचाव पथके सांगलीत दाखल झाली आहेत.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात ७४५६९ क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा ३७.३६ झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयना नगर २५३ मीमी, नवजा २७२ मीमी, महाबळेश्वर ३३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर