सोलापूर, २८ जुलै २०२०: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात दौंडमधून येणाऱ्या विसर्गामुळे व धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणाच्या पाणीपातळीत गेल्या दहा दिवसात जवळपास ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
१८ जुलैला संध्याकाळी मायनमधून प्लसमधे आलेल्या उजनी धरणाच्या वरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी उजनी धरणाच्या परिसरात मृग, आर्द्रा, पुनर्वसू या नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसाने व आता पुष्य नक्षत्रात होत असलेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ होत असून २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता धरणातील एकूण पाण्याची टक्केवारी ८.७३ एवढी होती.
पावसाने पुढेही असाच जोर धरल्यास उजनी धरण लवकरच शंभरी पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंगळवारी दुपारी धरणातील एकूण पाणी पातळी ४९१.६८० मीटर होती. तर एकूण साठा १९३५.२० दशलक्ष घनमीटर आणि त्यापैकी उपयुक्त साठा १३५.३९ दशलक्षघनमीटर एवढा राहिला. तर पाण्याची टक्केवारी ८.७३ टक्केपर्यंत पोहचली आहे तर उजनीत दौंडमधून ३६६५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग येत आहे.
पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये असाच पाऊस सुरू राहावा अशीच अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी