पाणी बंधाऱ्यातून सीना नदीत सोडले पाणी

सोलापूर, दि.१४ मे २०२०: पाणी बंधारा येथून सीना नदीत कोर्सेगावपर्यंत पाणी सोडण्यात येत असल्याची लेखी माहिती अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी माजी आमदार दिलीप माने यांना दिली आहे.

उजनी जलाशयातून सीना नदीत पाणी सोडले नसल्याने मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठचे शेतकरी अडचणीत आले होते. शेतकऱ्यांची अडचण सोडविण्यासाठी कारंबा शाखा कालवा ३९ मधून सीना नदीत पाणी सोडावे अशी मागणी माने यांनी केली होती.

माने यांनी याबाबतचे पहिले पत्र २९ एप्रिल रोजी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले होते. पत्र देऊन देखील कार्यवाही होत नसल्याने माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारपासून अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी १० पासून हे आंदोलन केले जाणार होते. दरम्यान आंदोलन करण्यापूर्वीच साळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले. हे पाणी बंधाऱ्यापासून ते कोरेगाव बंधाऱ्यात पोहचेपर्यंत सोडण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास लॉकडाऊनमुळे हिरावला गेला आहे. द्राक्ष, खरबूज, कलिंगड यासह इतर शेतमालामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीला सामोरे जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना सीना नदीतून त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते.

सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी आता मिळाले आहे. या परिसरातील शेती, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी लागणारे पाणी, वैरणीसाठी लागणारे पाणी असे अनेक प्रश्न मार्गी लागतील.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा