भिवंडी, ५ ऑगस्ट २०२०: दडी मारून बसलेला पाऊस हा सोमवार पासून पुन्हा सुरू झाला मात्र मंगळवारी पावसाची तीव्रता ही जास्त होती. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहेत आणि यात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहराचा सुद्धा समावेश आहे.
भिवंडीत सखोल ठिकाणी पाणी शिरलं आहे तसेच अनेक दुकांनासह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहवयास मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिंवडी आणि उल्हासनगर परिसरात सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. नाले सफाई व्यवस्थित झाली नसल्याने नाले, गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे.
तीनबत्ती, शिवाजी नगर, भाजीमार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत. तर महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी, ईदगाहरोड येथील कामवारी नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने पालिका प्रशासनाने त्यांना दुसरीकडे सुरक्षितस्थळी हलवले आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे