छत्रपती संभाजीनगर, १० जुलै २०२३ : राज्यात मान्सून सुरू झाला खरा परंतु, अजूनही बहुतांश जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. मराठवाड्यामध्ये जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठी आता कमी होत आहे. मराठवाड्यातील ११ प्रमुख धरणात आज रोजी ३३.४८% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात २६.९३% च पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी आता पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे जायकवाडी धरण ३३% भरेपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाणार नाही.
मराठवाड्यात यावर्षी जून महिन्यात पावसाने जवळपास पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे पेरण्या रखडल्या. तर विभागातील छोट्या-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील आता कमी होता असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी छोटे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर विभागातील प्रमुख ११ धरणात सध्या ३३.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आजच्या दिवशी हाच पाणीसाठी ४४.०६% होता. जर अशीच परिस्थिती राहिल्यास मराठवाड्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले होते. मात्र या वर्षी जून महिना कोरडा गेला आहे. त्यात जुलै महिन्यात देखील म्हणावा असा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. मराठवाड्यात सध्या २०% पेरण्या झाल्या आहेत. तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची भीती आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर