पाणीटंचाईत पाण्याचा अपव्यय; जलवाहिनीतून हजारो लीटर पाण्याची नासाडी

23
hapasar Water Isuee
पाणीटंचाईत पाण्याचा अपव्यय; जलवाहिनीतून हजारो लीटर पाण्याची नासाडी

Water Wastage Due to Pipeline Leakage: हडपसर उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच, हडपसर येथील ससाणेनगर भागात जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे पाणी वाया जात असून, याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ससाणेनगर येथील कॅनॉलजवळ असलेल्या जलवाहिनीच्या नॉबमधून पाण्याचे कारंजे उडत आहेत. त्यामुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे अनेकदा तक्रार केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या संदर्भात दिलीप गायकवाड, गणेश बोराटे, अविनाश काळे, सागर ससाणे यांनी सांगितले की, “जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याची तक्रार आम्ही महापालिकेत केली, त्याचे फोटोही व्हायरल केले. मात्र, तरीदेखील महापालिकेकडून याची दखल घेतली जात नाही.”

टँकरने पाणीपुरवठा करतानाही रस्त्यावर पाणी सांडते, टँकर भरणा केंद्रावर हजारो लीटर पाणी वाया जाते, व्हॉल्व्ह, जीर्ण जलवाहिनी दुरुस्त का करत नाही, या प्रश्नाचे उत्तर महापालिका अधिकारी देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना आता स्वतःहून दुरुस्ती करावी लागेल, असा इशारा हिरालाल अगरवाल या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

पाणीपुरवठा विभागाने त्वरित या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा