आम्ही राजकीयदृष्ट्या अस्पृश्य ठरलोय, AIMIM ची ‘INDIA’ वर नाराजी

मुंबई, १९ जुलै २०२३ : बंगळुरु येथे देशभरातील विरोधी पक्षांची काल बैठक पार पडली. या बैठीकासाठी देशभरातून विविध विचारांचे २६ राजकीय पक्ष उपस्थित होते. या बैठकीत जुन्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नाव बदलून भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी (INDIA) असे करण्यात आले. विरोधकांनी अत्यंत विचाराने हे नाव शोधले आहे. देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते. त्यावरून आत्ता असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयमएमआयएम पक्षाने जोरदार टीका केली आहे. विरोधकांना आमचा पक्ष अस्पृश्य आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले नाही. बाकी सर्वांना बोलावले फक्त आम्हीच त्यांना वर्ज्य आहोत, असे म्हणत AIMIM ने नव्याने स्थापन झालेल्या आघाडीवर टीका केली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात विरोधकांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. परंतु या दोन्ही बैठकींच्या वेळी AIMIM पक्षाला निमंत्रण दिलं नव्हतं. यावर AIMIM पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. AIMIM प्रवक्ते वारिस पठाण यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले की, आम्ही त्यांच्यासाठी राजकीय अस्पृश्य आहोत. आम्ही त्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांना पाहिले. ज्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवर टीका केली होती, शिव्या दिल्या होत्या. पण आता ते बंगळुरुमध्ये उपस्थित होते. तेथे नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले, जे पूर्वी भाजपसोबत होते. आम्ही कधीच भाजपसोबत गेलो नाही.

विरोधी पक्ष बोलतात की, यांना देशाचं संविधान वाचवायचं आहे, लोकशाही टिकवायची आहे, भाजपाला हरवायचं आहे, परंतु आमचंसुद्धा तोच उद्देश आहे. आम्हालाही तेच करायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत भाजपाला हरवायचं आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही, हाच आमचाही प्रयत्न असेल. पण तुम्ही विरोधी पक्ष आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव करण्यासाठी एआयमएमआयएम पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. असे असतानाही त्यांनी आम्हाला बोलावले नाही. आम्हीही विरोधी पक्षात आहोत. असे असतानाही त्यांनी आम्हाला बोलावले नाही, असे म्हणत वारीस पठाण यांनी विरोधकांवर नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा